सोलापूर : वाढती महागाई, दुकानांचे वाढलेले खर्च आणि सलून व्यवसायिकांच्या मागण्यांचा विचार करून सोलापूर शहरातील दाढी व कटिंगच्या दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्था, सोलापूरने घेतला आहे. ही दरवाढ १ जुलै २०२६ पासून लागू होणार असल्याची माहिती संस्थेचे शहराध्यक्ष वैभव शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर शहरातील सलून व्यावसायिकांची प्रतिनिधी संस्था असलेल्या नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्थेच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यभरातील वाढत्या महागाईचा विचार करून सलून व्यवसायातील सेवांच्या दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सोलापूरमध्येही नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयानुसार कटिंगचा दर १२० रुपयांवरून १३० रुपये, तर दाढीचा दर ६० रुपयांवरून ७० रुपये करण्यात आला आहे. सुधारित दरपत्रक लवकरच सर्व सलून दुकानदारांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, शहरातील सर्व सलूनमध्ये १ जुलैपासून नवीन दरानुसार शुल्क आकारले जाणार आहे.
याच बैठकीत संस्थेच्या नवीन कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. शहराध्यक्षपदी वैभव शेटे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी बापूसाहेब काळे व भारत शिंदे, सचिवपदी श्रीकांत राऊत, सहसचिवपदी प्रभाकर भालेकर, कार्याध्यक्षपदी प्रभाकर राऊत, खजिनदारपदी संतोष राऊत आणि प्रसिद्धीप्रमुखपदी सचिन चौधरी यांची निवड झाली. तसेच संजय चिखले, गणेश वाघमारे, प्रकाश शिंदे, मनोज डिंगे आणि आनंद वाघमारे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी सर्व सलून व्यावसायिकांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून व्यवसाय अधिक सक्षम करण्याचे आवाहन करण्यात आले. सुधारित दरवाढीबाबत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यांनी केले.
या पत्रकार परिषदेला पांडुरंग चौधरी, श्रीकांत राऊत,
बापूसाहेब काळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 7