सोलापूर :जिल्हा बँक निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार एकूण ८६.९४ टक्के मतदान झाले. ११ तालुक्यांमध्ये उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर २ हजार ५९६ मतदारांपैकी २ हजार २५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी सांगितले.
डीसीसी बँकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांच्या मतदानाच्या आकडेवारीत अक्कलकोट तालुक्याने शंभर टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुका मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर राहिला आहे. यामध्ये सांगोला ९६.८३ टक्के, बार्शी ९६.२६ टक्के, माळशिरस ९५.६४ टक्के, मंगळवेढा ९३.४४ टक्के, मोहोळ ९०.६९ टक्के, दक्षिण सोलापूरमध्ये ९०.०४ टक्के, पंढरपूरमध्ये ८८.०३ टक्के मतदान झाले आहे. तर माढा तालुक्यात ७३.४६ टक्के आणि उत्तर सोलापूरमध्ये ७२.२५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
या निवडणुकीत अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माळशिरस, माढा, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या ११ तालुक्यांतील मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सांगोला आणि बार्शी तालुक्यांतही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे माढा, पंढरपूर, माळशिरससह अन्य तालुक्यांमध्येही मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली.
डीसीसी बँकेच्या निवडणुकीत नऊ संचालक निवडले जाणार असल्याने या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा सुरू झाली आहे.
चौकट
इतके झाले मतदान
एकूण मतदार : २,५९६
प्रत्यक्ष मतदान : २,२५७
मतदानाची टक्केवारी : ८६.९४%
मतदान न केलेले : ३३९
तालुका निहाय मतदान केंद्रे : ११
चौकट
‘दोन्ही पार्ट्या आमच्याच!’ आ. देशमुखांच्या वाक्याने मतदान केंद्रावर चर्चा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोण कोणाच्या बाजूने आणि विरोधात, याची चर्चा रंगलेली असतानाच आ. विजय देशमुख यांनी आपल्या एका विधानाने राजकीय वातावरणात रंगत आणली. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘दोन्ही पार्ट्या आमच्याच!’ अशी टिप्पणी केली. त्यांच्या या विधानाची मतदान केंद्रावर चांगलीच चर्चा रंगली.
चौकट
मतपत्रिकेवर बाहेरून शिक्के मारून आणले ?
सांगोला येथे डीसीसी बँक निवडणुकीदरम्यान मतपत्रिकेवर बाहेरून शिक्के मारून आणले जात असल्याचा आरोप खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला होता. याची पूर्ण माहिती घेऊन सीसीटीव्ही तपासल्याअंती अशी कोणतीही घटना प्रथम दर्शनी निदर्शनास आढळून आली नसल्याचे उपनिबंधक मुकुंद पवार यांनी सांगितले.
चौकट
आपली क्षमता पाहून जागा मागितल्या असत्या तर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रत्येकाने आपली क्षमता लक्षात घेऊन जागांची मागणी केली असती, तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती,
– आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
चौकट
दिलीप माने यांचे शक्तिप्रदर्शन
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी बँक) निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून, मतदानाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत मतदान केंद्राकडे रवाना होण्यापूर्वी फोटोसेशन केले. त्यांच्या या उपस्थितीमुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले.
चौकट
अमोल शिंदे व मनीष देशमुख यांनी मारल्या एकमेकांशी गप्पा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपचे मनीष देशमुख आणि शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्या लढतीकडे. सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदान केंद्रावर अमोल शिंदे, मनीष देशमुख, चेतन नरोटे, तडवळकर, देवकर दिलीप पतंगे, श्रीशैल बनशेट्टी या सर्वच नेत्यांनी एकत्रित येऊन एकमेकांशी मनमोकळे पणाने गप्पा मारल्या.



















