सांगोला – सांगोला नगरपरिषदेच्या हद्दीतील थकीत मालमत्ता कराची वसुली होऊन नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने सर्वसाधारण सभेने दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या ठराव क्र.२८४ अन्वये एकत्रित मालमत्ता करा वरील एकूण दंडाच्या ५० टक्के पर्यंतचा दंड माफ करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार मुख्याधिकारी यांनी दि. १९ मे २०२५ पर्यंतच्या थकित मालमत्ता करा वरील दंडापैकी ५० टक्के दंड माफ करणे बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांना सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या मंजुरीने अभय योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र मालमत्ताधारकांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये ५० टक्क्यांपर्यंत माफी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अभय योजनेअंतर्गत मूळ मालमत्ता कराच्या रक्कमेत कोणतीही सवलत मिळणार नाही. केवळ थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये ५० टक्के सवलत मिळेल. दि.१९ मे २०२५ पर्यंतच्या थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यासाठी ही योजना लागू राहील. थकीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच शास्ती माफीचा लाभ मिळेल. मालमत्ता कराची थकबाकी भरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नगर परिषदेकडे रीतसर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत ५० टक्के दंडा व्यतिरिक्त इतर सर्व रक्कम भरलेली पावती जोडणे आवश्यक राहील. सदर योजना २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहील, याप्रमाणे योजनेच्या प्रमुख अटी व लाभ आहेत.
चौकट-१
कराचा वेळेवर भरणा केल्यामुळे नगरपरिषदेच्या विकासकामांना गती मिळण्यास मदत होईल. तसेच शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व इतर नागरी सुविधांचा दर्जा अधिक चांगला राखण्यास हातभार लागेल.
आजच आपली मालमत्ता कराची थकबाकी तपासून घ्या आणि अभय योजनेचा लाभ घ्या.
-आनंदा माने, नगराध्यक्ष
चौकट-२
सांगोला शहरातील सर्व थकबाकीदार मालमत्ताधारक नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या अभय योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडील थकीत मालमत्ता कर त्वरित भरावा व ५० टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा.
-सुधीर गवळी, मुख्याधिकारी
Views: 9