आम्ही तुमच्या वेदना जाणतो, असा मार्मिक संदेश देत भाजप नेते तुषार भारतीय यांनी हॉकर्सच्या आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून रोजगार देण्याऐवजी स्वतःच्या हट्टासाठी चौकात दहीहंडी केल्याने हातमजूरी करणाऱ्यांचा त्यांनीच चार दिवसांचा रोजगार बुडवला. अशा रोजगार बुडविलेल्या हॉकर्सना १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता गुरुकुल व्यायाम शाळा, स्वस्तिक नगर येथे नुकसान भरपाई म्हणून मदतीचा धनादेश वितरित केला जाणार आहे.
शहरातील नवाथे चौक म्हणजे अमरावतीची मिनी चौपाटीच. दररोज येथे खवय्यांची मोठी गर्दी उसळते. सुमारे ४० पेक्षा जास्त दुकाने येथे विविध खाद्यपदार्थांची लागतात. अनेक कामगार त्या गाड्यांवर कामाला आहेत. त्या सर्व हॉकर्स व कामगारांच्या परिवाराचा उदरनिर्वाह यावर चालतो. रविवारी तर येथील गर्दी काही न्यारीच असते. परंतु या रविवारी व गेल्या ३ दिवसांपासून नवाथे चौक येथे ही चौपाटी भरू शकली नाही. युवा स्वाभिमान पक्षाची राजकीय हंडी त्याला कारणीभूत ठरली. आयोजकांच्या हेकेखोरीमुळे येथे दुकाने लावणाऱ्यांची व तेथील कामगारांची वाताहत झाली.
त्यांचा ४ दिवसांचा व्यवसाय बुडाला. सोबत नवाथे चौकात भाजी विक्रेते, फळ विक्रेते व नर्सरी विक्रेता यांचे पण आर्थिक नुकसान झाले. त्यांच्या या वेदना काय असतात हे जाणून भाजप नेते तुषार भारतीय यांनी दहिहंडीमुळे धंदा बुडालेल्या हॉकर्सना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. आम्ही तुमच्या वेदना जाणतो असा मार्मिक संदेश देत त्यांनी हा आर्थिक मदतीचा पुढाकार घेतला आहे.