बारामतीत अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रम मंजूर
पुणे 19 सप्टेंबर (हिं.स)बारामती येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झाला असून दहा विद्यार्थ्यांना मान्यता मिळाली असून त्याची प्रवेशप्रक्रीया प्रारंभ झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली.
या महाविद्यालयामध्ये एम.बी.बी.एस. पदवीसाठी शेवटच्या वर्षाचे सर्व म्हणजे शंभर विद्यार्थी दाखल झाले असून आता बारामतीच्या वैदयकीय महाविद्यालयात आता पाच वर्षांसाठीचे मिळून पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, शरीरक्रिया शास्त्र या विषयासाठी चार तर रोगप्रतिबंधक शास्त्र या विषयासाठी सहा अशा दहा विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळाली आहे. या पैकी पहिल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशही झाला असून उर्वरित विद्यार्थी आल्यानंतर बारामतीत पदव्युत्तर वैदयकीय शिक्षणही या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार असल्याचे उपअधिष्ठाता डॉ. अंजली शेटे यांनी नमूद केले.