सार्वजनिक गणेशोत्सवात शनिवारपासून गणपतीचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी गर्दी होण्याच्या शक्यतेने शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता; तसेच अंतर्गत रस्ते सायंकाळनंतर बंद केले जाणार असल्याने नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागेल.
घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यास दर वर्षी गर्दी होते. यंदाही शहराच्या मध्यभागात मोठी गर्दी होण्याच्या शक्यतेने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. २३ ते २७ सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाच ते गर्दी ओसरेपर्यंत मुख्य रस्ते बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.