मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यातील मुढवी येथे माण नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे शेतकरी त्रस्त झाला असून विरोध करणाऱ्या शेतकऱ्यालाच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक तक्रार समोर आली आहे. याबाबत मुढवी येथील शेतकरी नरहरी कांबळे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे,
तक्रारदाराचे म्हणणे आहे की, ते कुटुंबासह शेतात राहतात. त्यांच्या शेताशेजारील माण नदीपात्रातून गेल्या दोन वर्षांपासून जेसीबी व टिपरच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात आहे.
या भरधाव वाळू टिपरमुळे गेल्या दोन वर्षात त्यांची *दोन म्हशी, एक गाय आणि एक रेडा असे ४ जनावरे चिरडून ठार झाली आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलो असता संबंधितांनी नुकसान भरपाई देतो म्हणून समेट केली , पण एक आतापर्यंत रुपयाही दिला नाही असा आरोप आहे. उलट “तुझ्या जनावरांना जसे मारले तसेच टिपर तुझ्या अंगावर घालून तुला मारून टाकू” अशी धमकी दिली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दि. २१/०८/२०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता तक्रारदाराचा मुलगा नागेश हा शेतात असताना त्याला अडवून लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीत मुढवीतील तिघांची व आणखी एका जेसीबी मालकाची नावे देण्यात आली असून “आम्ही मोठ्या पुढाऱ्यांचे नातेवाईक आहोत, आमचे पोलीस काही करू शकत नाही” अशी दमदाटी केली जात असल्याचेही म्हटले आहे.
“सदर लोक गुंड प्रवृत्तीचे असून माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका आहे, मला न्याय मिळावा” अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
Post Views: 23