अमरावतीमध्ये एका माथेफिरु तरुणाने आपल्या प्रेयसीच्या आईला व भावाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीच्या आईचा व भावाचा खून केल्यानंतर तरुणाने स्वत:लाही पेटवून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे.
अमरावतीमधील वरुड तालुक्यातील वंडली येथे रविवारी रात्री 1 वाजेच्या दरम्यान ही थरारक घटना घडली. आरोपी आशिष ठाकरे (वय 25 वर्षे) असे या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. लता सुरेशराव भोंडे (वय 45 वर्ष) आणि त्यांचा मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (वय 20 वर्षे) अशी जाळून खून करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी आशिष ठाकरेनेही नंतर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून तरुण आणि त्याची प्रेयसी एकत्र राहत होते. त्यांच्यातील प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे दोघेही दुसरीकडे एकत्र राहू लागले. काही काळाने या दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. त्यांच्यामधील वाद वाढत गेला. त्यानंतर तरुणीने तरुणासोबतचे संबंध तोडले व पुन्हा आपल्या घरी राहायला आली.
प्रियकराशी भांडण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आपल्या घरी राहत होती. ती आई आणि भावासोबत राहत होती. प्रेयसीला आपल्यासोबत पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रियकर सतत तिच्या घरी जात होता. तरुणीची आई आणि भाऊ पुन्हा तरुणीला तरुणासोबत पाठवण्यास तयार नव्हते. यादरम्यान, तरुणीची आई आणि भाऊ यांच्यासोबतही तरुणाचे भांडण झाले.
प्रेयसी घरी नसताना कृत्य
प्रेयसीच्या आई व भावाने केलेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन या तरुणाने असे कृत्य केल्याचे समोर येत आहे. प्रेयसी घरी नसताना हा तरुण तिच्या घरी गेला व त्याने तिच्या आईला आणि भावाला जिवंत जाळले. मात्र, नंतर आपण केलेल्या कृत्यामुळे भयभीत होऊन त्याने स्वत:लाही संपवून घेतले. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.