समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी ट्रॅक्टरचालकाने ब्रेक दाबल्याने ट्रॉली पलटी होऊन दहा प्रवासी जखमी झाले. अनगरजवळील लोकनेते साखर कारखान्याजवळ हा अपघात झाला. यातील एकाचा बुधवारी पहाटे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. लालदेव ननवरे (५०) असे त्याचे नाव आहे. यासोबत अशोक झोंबाडे (३५), सीमा अशोक झोंबाडे (४०, दोघे रा. घारेपुरी ता. बार्शी), देवीदास शिंदे (२०), पांडुरंग नरगुडे (५०), सविता काळोबा जाधव (५०), तनुजा अशोक झोंबाडे (१७), आशा देवीदास शिंगारे (६०),अश्विनी अशोक झोंबाडे (१२) अशी जखमींची नावे आहेत.
यातील ट्रॅक्टर मंगळवारी रात्री मोहोळहून अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याकडे निघाला होता, रिकाम्या ट्रॉलीमध्ये दहा जण बसले होते. अनगर साखर कारखान्याच्या ५०० मीटर अंतरावर समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे ट्रॉली पलटी झाली. आतील प्रवासी जखमी झाले.