मध्यप्रदेशातील दिंडोरी येथे पिकअप व्हॅनला बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण जखमी झाले आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार अपघातग्रस्त व्हॅन बुधवारी रात्री डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आटोपून शाहपुरा पोलीस ठाणे आणि बिचिया पोलीस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटातून परतत होती. घाटात असताना पिकअप व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन उलटली. यात 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी शाहपुरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताला बळी पडलेले सर्वजण आमादेवी गावचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये 8 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्याचं बळ मृतांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना मोहन यादव यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.