सोलापूर, 6 ऑगस्ट, (हिं.स.) – भीमा आणि नीरा खोर्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदी इशारा पातळीवरुन वाहू लागली आहे. पूराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरासह नदीकाठच्या 42 गावांना सावधानतेचा इशारा दिली आहे. पंढरपुरात चंद्रभागा 35 हजार क्युसेकने वाहत आहे.
दरम्यान, उजनी धरणातून सायंकाळी सात वाजता पुन्हा विसर्ग वाढवला जाणार असून तो 1 लाख 25 हजार क्युसेक इतका करण्यात येणार आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी झाला आहे. सध्या 33 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. चंद्रभागा धोका पातळी गाठेल असा अंदाज आहे.
दरम्यान, पूरजन्य परिस्थिती लक्षात घेता शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगणातील जवळपास 75 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. या सर्व कुटुंबाची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असली तर भीमा आणि नीरा खोर्यात मात्र जोरदार पाऊस सुरु आहे.


















