प्रतिनिधी – बाबासाहेब गर्जे, सोनपेठ.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे, सोनपेठ येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर आपल्या खात्याची -केवायसी करण्यासाठी महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. गेली दोन दिवसांपासून बँकेतील कनेक्टिव्हिटी अभावी आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ई-केवायसी चे काम पूर्ण करण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा हप्ता नुकताच महिलांच्या बँकेतील खात्यावर जमा होतात बँकेतून पैसे उचलण्यासाठी महिलांची एकच गर्दी पहावयास मिळत आहे. त्यातच अनेक महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा न झाल्याने त्यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न करणे व ई केवायसी कामासाठी महिलांनी आता बँकेत व बॅंकेसमोर तोबा गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे.
सोनपेठ तालुक्याला एकमेव राष्ट्रीयकृत बँक असलेल्या असलेल्या भारतीय स्टेट बँकेला गेली दोन महिन्यापासून शाखाधिकारी नाहीत. त्यामुळे बॅंकेत अगदी तोकड्या कर्मचाऱ्यावर तालुक्यातील खातेदारांचे कामकाज सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होताच पैसे उचलणाऱ्या महिलांची बँकेत गर्दी झाली. ज्या महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली नाही अशा महिलांनी बँक खात्याला आधार लिंक व ई-केवायसी करण्यासाठी बँकेच्या समोर रांगा लावल्या आहेत. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी सोनपेठ पोलिसांची ही मोठी धावपळ सुरू आहे.