बिलोली – राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार एकनाथजी शिंदे यांचे सचिव तथा संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळीचे माजी विद्यार्थी श्री. बालाजी पाटील खतगावकर यांनी ११ नोव्हेंबर रोजी खानापूर पुनर्वसन येथील ‘स्वाधार’ प्रकल्पास भेट देऊन पूर्ण झालेल्या पहिल्या घरकुलाची पाहणी केली. पर्यावरणपूरक आणि कमी खर्चातील घरबांधणीच्या या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा फटका बसलेल्या नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरणग्रस्त हासनाळ आणि रावणगाव येथील ३०० कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा, या उद्देशाने संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या वतीने ‘स्वाधार’ हा महत्त्वाकांक्षी घरकुल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. खानापूर पुनर्वसन येथे पर्यावरणपूरक पद्धतीने या घरांची उभारणी करण्यात येत असून, या उपक्रमाला नांदेड जिल्हा प्रशासन आणि मुंबई येथील केअरिंग फ्रेंड्स या संस्थेचे सहकार्य लाभत आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे लाल मातीच्या विटांपासून तयार करण्यात येणारी पर्यावरणस्नेही घरे. या घरांना प्लास्टर अथवा रंगकामाची आवश्यकता नसते. नैसर्गिक बांधकाम पद्धतीमुळे उन्हाळ्यातही घरातील तापमान तुलनेने थंड राहते. त्याचबरोबर बांधकामाचा खर्चही कमी येतो. सुमारे ४५० चौरस फूट क्षेत्रफळाची ही घरे लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रकल्पातील पहिल्या पूर्ण झालेल्या घराची पाहणी केल्यानंतर श्री. खतगावकर यांनी बांधकाम पद्धती, गुणवत्ता आणि पर्यावरणपूरक संकल्पनेची माहिती घेतली. तसेच लाभार्थी कुटुंबांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. आगामी दोन वर्षांत ३०० कुटुंबांना या प्रकल्पाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांनीही या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पूरग्रस्त कुटुंबांच्या जीवनात पुन्हा स्थैर्य निर्माण करण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळाने हाती घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नमूद करून, स्वाधार प्रकल्पाच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही श्री. खतगावकर यांनी दिली.
यावेळी संस्था कार्यकर्ते अभिजित महाजन, व्यंकट शिंदे, शिवसेनेचे पदाधिकारी प्रभाकर पाटील तांदळीकर, त्र्यंबक इंगोले तसेच बिलोली, देगलूर व मुखेड येथील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह हासनाळ व रावणगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.



















