टेंभुर्णी – मौजे रांजणी शिवारातील उजनीच्या मुख्य कॅनलमध्ये सापडलेल्या हातपाय बांधलेल्या अनोळखी युवकाच्या खुनाचा तपास टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक करून खुनाचे गूढ उकलले आहे.
३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी उजनी धरणालगतच्या मुख्य कॅनलमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधून, त्याला दगड लावून पाण्यात फेकण्यात आले होते. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर मृत व्यक्तीचा फोटो प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करून ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातून मयताची ओळख आश्रम विठ्ठल करंडे (वय ३१, रा. फपाळवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी पटली.
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याचे वडील विठ्ठल नवनाथ करंडे आणि नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पुष्टी केली. गावात चौकशी केली असता मयताला दारूचे व्यसन असल्याचे, तो नेहमी घरातील व बाहेरील लोकांना त्रास देत असल्याचे समोर आले.
तपासादरम्यान पोलिसांनी मृताचा भाऊ रणजित उर्फ सौरभ विठ्ठल करंडे याच्यावर संशय घेतला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आणि त्याचे साथीदार सचिन धर्मा चौधरी व सोमनाथ उर्फ श्याम मोहन तांबे (तिघेही रा. फपाळवाडी, ता. बार्शी) यांनी आश्रम करंडेचा खून केल्याची कबुली दिली.
तिघांनी मिळून बार्शी जवळील कदमवस्ती परिसरात दाताळाने डोक्यात मारून, नंतर गळा आवळून आश्रम करंडेचा खून केला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून हातपाय बांधून, दोरीला दगड बांधून मृतदेह उजनी कॅनलमध्ये फेकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अटक आरोपींना माढा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक मा. प्रितम यावलकर आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक मा. अंजना कृष्णा (करमाळा उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, सपोनि विशाल वायकर, पीएसआय कुलदीप सोनटक्के, अजित मोरे, पुरुषोत्तम धापटे, विलास रणदिवे, प्रदीप पर्वते, संदीप गिरमकर, विलास नलवडे, रमेश जाधव, मोहन तळेकर, सुरज मुलाणी, प्रसाद अनभुळे, प्रकाश जगदाळे, गणेश इंगोले तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलचे अधिकारी सहभागी झाले होते






















