बार्शी – नगरपालिकेतील सफाई कर्मचारी गणेश गोविंद बनसोडे (वय ४५, रा. म्हाडा कॉलनी, गाडेगाव रोड, बार्शी) यांनी व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृताची पत्नी वैशाली गणेश बनसोडे (वय ३५) यांनी सातजणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार निलेश खुडे (रा. सुभाषनगर लहुजी चौक), प्रशांत माने (रा. बालाजी कॉलनी), विशाल गुगळे (सोनार, रा. बार्शी), अतुल कांबळे (रा. मंगळवार पेठ झोपडपट्टी), संगीता पवार (रा. ४२२ बार्शी), सचिन सोनवणे (रा. भीमनगर), व संतोष नानासाहेब कळमकर (रा. ४२२ बार्शी) या सातजणांनी व्याजाच्या पैशांच्या कारणावरुन गणेश यांना सातत्याने त्रास दिला होता.
फिर्यादी वैशाली बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे पती गणेश गेल्या दहा वर्षांपासून बार्शी नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. पतीच्या उत्पन्नावरच घराचा उदरनिर्वाह चालत होता. दिवाळीनिमित्त त्या आपल्या दोन मुलांसह सोलापुरला माहेरी गेल्या असताना, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या नणंदेचा फोन आला. तिने गणेश यांनी ग्रामीण रुग्णालयासमोरच्या कँटीनमध्ये गळफास घेतल्याची माहिती दिली.
तक्रारीनुसार, गणेश बनसोडे यांनी गेल्या वर्षभरात वेळोवेळी वर नमूद सातजणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. मागील काही महिन्यांपासून त्यांनी सतत पैशांचा तगादा लावून, घर आणि कामाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ, धमक्या व जातीवाचक अपमान करुन मानसिक त्रास दिला होता.
प्रशांत माने, संगीता पवार आणि संतोष कळमकर हे वारंवार त्यांच्या घरी येऊन जातीवाचक बोलून, तुझी लायकी नाही, हातपाय मोडतो, अशा शब्दांत धमक्या देत असत. संगीता पवार हिने तर ‘पैसे दिले नाहीस तर महिलांना घेऊन छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल करेन’, अशी धमकी दिली होती, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
या सर्व मानसिक ताणामुळे गणेश बनसोडे नैराश्यात गेले होते. पत्नीने त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेर ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले.
घटनास्थळी पोलिसांना चार सुसाईड नोट्स मिळाल्या असून, त्यामध्ये वरील सातही जणांची नावे नमूद आहेत. त्या सर्वांकडून झालेल्या सावकारकीच्या त्रासामुळेच आत्महत्या केल्याचे स्पष्टपणे लिहिलेले आहे.
या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत. घटनेमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

















