हिंगोली – पांडुरंगाचे लाडके भक्त म्हणून ओळखले जाणारे थोर राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ७५५ वा जयंती सोहळा त्यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नर्सी नामदेव येथे ता.२ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहाने व भक्तिमय वातावरणात हजारो पणत्या पेटून दीपोत्सवाने साजरा करण्यात आला. कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी पहाटे ६:३८ वाजता हजारो पण त्या पेटून दीपोत्सवाने शेकडो भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
संत नामदेव महाराज यांच्या जयंती सोहळा व प्रबोधनी एकादशी निमित्त पहाटे पाच वाजता संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते सपत्नीक श्री च्या वस्त्र समाधीचे महापूजा करण्यात आली.
यावेळी संस्थानचे सचिव द्वारकादास सारडा,उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार,रमेश महाराज मगर,मनोज आखरे, भागवत सोळंके,माणिक लोडे,संतोष टेकाळे,सुभाष हुले, माधव पवार,राहुल मोरे,शाहुराव देशमुख,कवी शिवाजी कऱ्हाळे,अशोक पवार,यांच्यासह जिल्ह्यातील व पर जिल्ह्यातील हजारो भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत नामदेवाचा जन्म सोहळा साजरा करण्यासाठी संस्थांनच्या वतीने महिनाभरापासून तयारी करण्यात येत होती या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ता २८ पासून करण्यात आले आहे.तर या हरिनाम सप्ताहाची सांगता ३ नोव्हेंबर रोजी काल्याच्या किर्तनाने करण्यात येणार आहे.
दरम्यान रविवारी जन्म सोहळ्यानिमित्त पहाटे श्री च्या वस्त्र समाधीची महापूजा, अभिषेक, आरती, भजन,कीर्तन, प्रवचन,आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने व विठ्ठल नामाच्या जयघोषाने पणत्या पेटवून साजरा करण्यात आला.
यावेळी संत नामदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी संस्थांनच्या वतीने मंदिर परिसरात मंडप व दर्शन रांगेची व्यवस्था केली होती.जन्म सोहळा व दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना संस्थानच्या वतीने फराळाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.
मंदिर परिसरात दीपोत्सवाची आरास रविवारी भल्या पहाटे मंदिर परिसर घाट परिसरात हजारो पणत्या मेणबत्त्या पेटवून दीपोत्सवाची आरास करण्यात आली होती तसेच नामदेवांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर रोशनाईने उजळून निघाला होता. तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री संत नामदेव महाराजांची रांगोळी व फुलातून आकर्षक प्रतिमा काढण्यात आली होती. नामदेवाच्या जन्म सोहळ्यानिमित्त आणि मंदिर परिसरात जन्मोत्सवाच्या वेळी फटाक्याची आतिषबाजी करून सोहळा भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.


























