पंढरपूर – तालुक्यातील आंबे येथे १५ नोव्हेंबर रोजी घडलेली विहिर दुर्घटनेची घटना अजून ताजी असतानाच सोमवारी तालुक्यात पुन्हा एक दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे घडल्याचे समोर आले आहे. या घटने मध्ये शेतातील बंद बोअरवेल मध्ये पडून दीड वर्षे वयाच्या एका चिमुलकीचा मृत्यु झाला आहे. उष्मती राहुल गावित (वय दीड वर्षे, रा.शिसा, ता.धडगाव, जि. नंदुरबार) असे मृत बालिकेचे नाव आहे.
या दुर्देवी घटनेची सविस्तर माहिती अशी की, रविवारी (दि.२२ नोव्हेंबर ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जळोली येथील साखर कारखान्या लगत गोरख कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड मजुराची ही बालिका पडली होती. अंदाजे ४५ ते ५० फूट खोलवर बालिका अडकल्याची माहिती मिळताच प्रशासन व बचाव पथकांकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच दोन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्रभर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.
अखेर सोमवारी (दि.२३ नोव्हेंबर) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाला बालिकेला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत बालिकेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्या नंतर या बालिकेचे पोस्टमार्टम करुन तिचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
——————
चौकट : ( हातावरुन लागला बालिकेचा शोध )
रविवारी दुपार पासूनच उष्मती तिच्या पाल्यांना दिसुन आली नाही. त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेवुन ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी रात्री आठच्या सुमारास बोअरवेल मध्ये कँमेरा सोडून तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांना तिचा बोअरवेल मध्ये हात दिसून आला. त्यावरुन उष्मती ही बोअरवेल मध्ये पडल्याचे निष्रन्न झाले. त्यानंतर तिला बाहेर काढण्यासाठी पथकांना पाचारण करण्यात आले.
——————-
चौकट : ( कार्तिकी यात्रेमुळे पथके होती पंढरपूरात)
सध्या कार्तिकी यात्रा सुरु आहे. परवा एकादशी आणि कालच व्दादशी पार पडली. पौर्णिमे पर्यंत यात्रा असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच एनडीआरएफच्या टीम पंढरपूरातच दाखल होत्या. दरम्यान बालिका बोअरवेल मध्ये पडल्याची माहिती मिळताच येथील प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे हे त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच या पथकांना घटनास्थळी पाचारण केले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.त्या नंतर पुण्यातील इंडिया लिफ्टच्या पथकाला देखील बोलविण्यात आले. हे पथक रात्री दोनच्या सुमारास येथे दाखल झाले. त्यांनी बोअरवेल मधुन बालिकेला बाहेर काढण्याचे आँपरेशन सुरु केले. सुमारे आठ ते दहा तासानंतर सकाळी ९ च्या सुमारास बालिकेला बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र दुर्देवाची गोष्ट म्हणजे तो पर्यंत बालिका दगावली होती. सुमारे बारा तासांपासून सुरु असलेल्या परिश्रमाला यश आले नाही. त्यामुळे सर्वत्र् हळहळ व्यक्त होत आहे.
———————-
चौकट : ( जिल्हाधिकाऱ्यांचा संवदेनशीलपणा )
पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील १५ नोव्हेंबर रोजी घडलेल्या विहिर दुर्घटनेच्या घटने नंतर देखील जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन लगेचेच घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी संपुर्ण रात्रभर स्वत: घटनास्थळी थांबून सर्व यंत्रणेला कामाला लावून १६ नोव्हेंबरला दुपार पर्यंत घटनास्थळावरुन चारही मृतदेह बाहेर काढण्याची मोहिम राबविली होती. त्यानंतर सध्या कार्तिक यात्रा सुरु असतानाच काल रविवारी जळोली (ता.पंढरपूर) येथे बालिका बोअरवेल मध्ये पडली. या घटनेची देखील माहिती मिळताच जिल्हाधिकारी त्वरीत घटनास्थळी दाखल होवून त्यांनी रात्रभर सर्व यंत्रणेला कामाला लावून शोधमोहिम राबविली. अखेर सोमवारी संबंधित बालीकेला बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले. मात्र ज्यावेळी त्या बालिकेला बाहेर काढले गेले त्यावेळी ती मृत अवस्थेत आढळून आली. या दोन्ही घटनेच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांची कार्यतत्परता आणि संवेदनशीलतेचा प्रत्यय आला.
Views: 113