पंढरपूर – सोलापूर येथील आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात दि पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक लि., पंढरपूरचे नाव तसेच बँकेत कार्यरत नसलेल्या व्यक्तींचा व्यवस्थापक म्हणून संदर्भ देऊन प्रसारमाध्यमांत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताच्या अनुषंगाने बँक वस्तुस्थिती स्पष्ट करीत असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री.सतीश मुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उमेश विरधे यांनी दिली.
सदर वृत्त व एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या अक्षय सुरवसे या व्यक्तीचा पंढरपूर अर्बन बँकेशी संबंध असल्याचा संदर्भ देण्यात आला आहे. तथापि, अक्षय सुरवसे हे दि पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक लि., पंढरपूरचे कर्मचारी नाहीत. त्यांचा बँकेच्या कर्मचारी वर्गाशी कोणताही संबंध नाही. तसेच एफआयआरमधील आरोपी हे बँकेचे सभासदही नाहीत व खातेदारही नाहीत.
सदर प्रकरणाच्या अनुषंगाने बँकेने सोलापूर पोलिसांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीबाबत शहानिशा केली असता, संबंधित व्यक्तीने बँकेचे नाव वापरून फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांकडून बँकेस देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेचे नाव, अधिकारी व कर्ज मंजुरी प्रक्रियेचा संदर्भ देऊन नागरिकांची दिशाभूल अथवा आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार असल्यास नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
अलीकडील काळात AI (Artificial Intelligence) तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, बनावट कागदपत्रे, खोटे संदेश तसेच बँक अधिकारी असल्याचा बनाव करून नागरिकांना विश्वासात घेऊन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांमध्ये बनावट कर्ज मंजुरीपत्रे, खोटी आश्वासने अथवा विश्वासार्ह वाटणारे संदेश तयार करून लोकांची दिशाभूल केली जाऊ शकते.
ते पुढे म्हणाले, आपली पंढरपूर अर्बन बँक कोणत्याही अनधिकृत एजंट, मध्यस्थ अथवा व्यक्तीमार्फत कमिशन घेऊन कर्ज मंजूर करून देत नाही. बँकेची कर्ज मंजुरी प्रक्रिया निर्धारित कर्ज धोरण, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीनुसारच पार पाडली जाते. कर्ज मिळवून देण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक कमिशन अथवा रक्कम देण्याची बँकेची अधिकृत पद्धत नाही. बँकेच्या नावाचा, अधिकारी पदनामाचा अथवा कर्ज मंजुरी प्रक्रियेचा गैरवापर करून कोणी आर्थिक व्यवहार अथवा आश्वासने देत असल्यास नागरिकांनी त्यावर विश्वास न ठेवता बँकेच्या अधिकृत शाखेशी अथवा व्यवस्थापक श्री.गणेश हरिदास- ९५११८६७००४ यांचेशी संपर्क साधून खातरजमा करावी.
बँकेने या प्रकरणासंदर्भात सोलापूर पोलिसांना निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच पंढरपूर अर्बन बँकेच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बँकेच्या नावाचा असा गैरप्रकार निदर्शनास आल्यास संबंधितावर बँक फौजदारी स्वरूपाची कारवाई करेल असा निर्णय बँक संचालक मंडळ व प्रशासनाने घेतला आहे.
बँक ग्राहकांचा विश्वास, पारदर्शकता आणि नियमबद्ध बँकिंग व्यवहार यांना सर्वोच्च प्राधान्य देत असून, बँकेच्या नावाचा गैरवापर करून होणाऱ्या अनधिकृत प्रकारांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन देखील बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Views: 95