अकलूज – माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेस दिनांक १२ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार असून यानिमित्त सलग तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, क्रिडा व मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तांदुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून १२,१३ व १४ नोव्हेंबर रोजी असे सलग तीन दिवस यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक,मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 11 लेझीम, 11 ते सायंकाळी पाच गजी ढोल, सायंकाळी सात ते दहा ह भ प राम महाराज अभंग वडापुरी यांचे कीर्तन, रात्री दहा वाजता पुष्पवृष्टी, अकरा ते बारा संगीत भजन, दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता श्रींची महापूजा, ग्रामस्थांचे नैवेद्य व महाप्रसाद, सायंकाळी सव्वा सात वाजता महाआरती, साडेसात ते दहा ह भ प संदीप महाराज मोहिते जुनोनी व इतर यांचे जुगलबंदी भारुड,
दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता भव्य दिव्य मुक्तपणे गुलालाची उधळण करत पालखी मिरवणुकीस सुरुवात, सायंकाळी सव्वा सात वाजता महाआरती, सायंकाळी साडेसात वाजता झंकार म्युझिकल ऑर्केस्ट्रा कोल्हापुर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रतिवर्षीप्रमाणे येणाऱ्या या यात्रेची उत्सुकता तांदूळवाडीकरांना लागून राहिली आहे. गुलालाची उत्साहात होणारी मुक्त उधळण यामुळे अवघे तांदूळवाडी श्री सिद्धनाथ जोगेश्वरीमय होऊन जात असते त्यामुळे दरवर्षी गावकरी बांधवांना या यात्रेची उत्सुकता लागलेली असते. यात्रे निमित्त लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे, जम्पिंग, वगैरे आलेले दिसत आहेत. यामुळे तांदूळवाडी गावामध्ये वेगळाच उत्साह पहावयास मिळत आहे. श्री सिद्धनाथ यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ यात्रेच्या तयारीचे नियोजन जोरकसपणे करताना दिसत आहेत.
















