पंढरपूर – कार्तिकी एकादशी निमित्त परंपरे प्रमाणे श्री विठ्ठलाची शहरातील नगरप्रदक्षिणा रस्त्यावरुन मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी नगरप्रदक्षिणा रस्त्यावर दुर्तफा मोठी गर्दी केली होती.
दरम्यान येथील माहेश्वरी (पूर्वीची खासगीवाले) धर्मशाळे पासून रविवारी दुपारी या रथयात्रेस सुरुवात झाली. त्या अगोदर माहेश्वरी धर्मशाळे मध्ये श्रीविठ्ठल, राही आणि रखुमाईंच्या मुर्तीवर सकाळी अभिषेक करुन विधीवत पुजा करण्यात आली. नातू, रानडे आणि देवधर या रथावरील मानकऱ्यांनी विठ्ठल, राहि आणि रखुमाईंच्या मुर्ती रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या लाकडी रथावर नेवुन ठेवल्या. त्या नंतर या रथयात्रेस सुरुवात करण्यात आली.
ही रथयात्रा पाहण्यासाठी नगरप्रदक्षिणा मागार्वर वारकऱ्यांची तसेच स्थानिक नागरिकांची दुर्तफा गर्दी झालेली दिसत होती. ऱथयात्रेवर खारीक, बत्तासे आणि सुट्टे पैसे उधळण्याची परंपरा आहे. त्यामुळे बत्तासे आणि खारकांची विक्री करणारे बरेच विक्रेते या नगरप्रदक्षिणा रस्त्यावर रथ येण्या अगोदर विक्री करण्यासाठी फिरताना दिसत होते. रथ जवळ आल्यानंतर त्याचे दर्शन घेवून भाविकांकडून मोठ्या शध्देने त्यावर खारकांचा वर्षाव केला जात होता. अनेक भाविक, स्थानिक नागरिक नगरप्रदक्षिणा रस्त्यावरील असलेल्या मठ, धर्मशाळा तसेच घरांच्या गच्चीवरुन रथयात्रेचा हा सोहळा याचि देहि याचि डोळा पाहून श्री विठ्ठलाच्या दर्शनाने मनोमनी त्रुप्त होताना दिसत होते.
दरम्यान माहेश्वरी धर्मशाळे पासून निघालेली ही रथयात्रा कालिकादेवी चौक, काळामारुती, चौफाळा, नाथचौक मार्गे पुढे पुढे मार्गक्रमण करीत होती. अखेर माहेश्वरी धर्मशाळेजवळ पुन्हा ही रथ यात्रा दाखल झाली. त्या नंतर या रथावरील उत्सवमुर्तीस पुन्हा धर्मशाळेत नेण्यात आल्या. त्या ठिकाणी पुन्हा या मुर्तिंची आरती होवून त्या मुळजागी पुन्हा ठेवण्यात आल्या. या नंतर या रथयात्रा उत्सवाची सांगता झाली. या वेळी भाविकांना प्रसादाचे देखील वाटप करण्यात आले.
———————————–
आषाढी, कार्तिकी यात्रेच्या वेळीच रथयात्रा –
आषाढी व कातिर्क एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात. सर्वच भाविकांना एकादशी दिवशी श्रीविठुरायांचे दर्शन घडत नसते. त्यामुळे आषाढी आणि कातिर्की एकादशीच्या सोहळ्यासाठी येथे आलेल्या प्रत्येकाला श्री विठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी बऱ्याच वर्षा पासून रथयात्रेचा उत्सव सरु करण्यात आलेला आहे. या रथयात्रे मध्ये श्री विठ्ठल, राही आणि रखुमाईच्या मुर्ती असतात.
—————
फोटोआळी : पंढरपूर : कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची शहरातील नगरप्रदक्षिणा मागार्वरुन रथयात्रा काढण्यात आली.

















