सोलापूर – पंचायत समिती तालुका व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान अद्यापही झाला नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. म्हणून शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करून वितरण करावे .
नोव्हेंबर महिन्यापासून हिवाळ्यात शाळांच्या शैक्षणिक सहलीचा हंगाम सुरू होतो. राज्यातील पर्यटन व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी सहली जात असतात. शैक्षणिक सहलीच्या परवानगीसाठी जिल्हा स्तरावर प्रस्ताव सादर करून शैक्षणिक सहलीला अधिकृत परवानगी घ्यावी लागते. सहलीला परवानगी देण्याचे अधिकार पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना द्यावेत, त्यामुळे शैक्षणिक सहलीसाठी परवानगी वेळेचा अपव्यय न होता लवकर मिळेल. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी कादर शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आंतरजिल्हा बदलीने सोलापुरात आलेल्या शिक्षकांचा डीसीपीएस पावत्यांचा हिशोब जिल्हा परिषदेकडून अद्यापही आला नाही,तो हिशोब संबंधित जिल्हा परिषदेकडून मागवावे. ज्यांचा डीसीपीएस पावत्यांचा हिशोब आला आहे परंतु तालुका स्तरावर लिगसी डाटा भरला नाही, याबाबत गटशिक्षणा अधिकारी यांना लीगसी डाटा भरण्याबाबत आदेशित करावे. अशा मागण्या निवेदनात करण्यात आले आहेत.
यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख, जिल्हाध्यक्ष रविंद्र जेटगी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पडदुणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत तसेच आंतरजिल्हा बदली ने आलेल्या शिक्षकांचा डीसीपीएस लीगसी डाटा भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल ,असे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी यावेळी सांगितले.

















