सोलापूर : तरुणांनी भगवान हनुमानाकडून भक्ती, शक्ती, सेवा आणि समर्पणाची भावना घेऊन शेती, उद्योग आणि समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे. व्यसनांपासून दूर राहून देव, देश, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन श्री श्री श्री काडसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील श्री दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिराचा कळसारोहण सोहळा शुक्रवारी श्री काडसिद्धेश्वर महास्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात भक्तिमय वातावरणात पार पडला. यानिमित्त आयोजित राष्ट्रउभारणी प्रेरणा महोत्सवाला हजारो भाविक, महिला आणि तरुणांनी उपस्थिती लावली.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता श्री महालिंगेश्वर मंदिरापासून श्री दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरापर्यंत ५५५ महिलांची जलकुंभ मिरवणूक व पदयात्रा काढण्यात आली. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. त्यानंतर सकाळी १० वाजता मुख्य कळसारोहण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आमदार सुभाष देशमुख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके, डॉ. चनगोंडा हविनाळे, शिवसेना नेते अमर पाटील, उद्योजक शिवानंद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि स्वामीजी उपस्थित होते. तादेवाडी मठाचे महानतेश स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. आपल्या प्रकृतीनुसार जीवनशैली ठेवावी आणि व्यसनांपासून दूर राहावे. शेतमालावर प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो. विषमुक्त आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी आणि त्यांचे बंधू कल्लाप्पा यांनी सेंद्रिय शेती तसेच हुरडा पार्टी महोत्सवाच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या पाच दिवसांच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महोत्सवात ड्रीम फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. देशभरातील ५१ पवित्र नद्यांच्या जलाचा अभिषेक, ५१ गावांतील मारुती मंदिरांमध्ये जलाभिषेक व निमंत्रण, एक हजार आठ भाविकांना हनुमान चालीसा वाटप, तसेच ४० किलो हुरड्याचा प्रसाद असे उपक्रम घेण्यात आले. याशिवाय मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ड्रीम फाउंडेशन परिवाराच्या वतीने काशिनाथ भतगुणकी यांच्या हस्ते या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन महानतेश स्वामीजी यांनी केले, तर आभार काशिनाथ भतगुणकी यांनी मानले.
Views: 12