सोलापूर – भारत आणि नेपाळ यांच्यात रंगणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० दृष्टिबाधित क्रिकेट मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या १७ सदस्यीय भारतीय महिला संघात सोलापूरच्या कुमारी गंगा कदम हिची पुन्हा एकदा उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया आणि समर्थानम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड यांनी ‘आयआयएफएल होम फायनान्स’च्या सहकार्याने या मालिकेची अधिकृत घोषणा केली आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या पहिल्या ऐतिहासिक महिला टी-२० अंध विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही गंगा कदम हिने भारतीय संघाचे उपकर्णधार म्हणून नेतृत्व केले होते. तिच्या नेतृत्वाखाली विश्वचषक विजेत्या भारतीय संघाने नेपाळवर मात करून विश्वविजेतेपदाचा ऐतिहासिक चषक उंचावला होता. आता पुन्हा एकदा तिच्या दांडग्या अनुभवावर आणि कौशल्यांवर विश्वास दाखवत निवड समितीने भारत-नेपाळ मालिकेसाठी भारतीय संघात तिच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.
ही पाच सामन्यांची मालिका २ ते ८ डिसेंबर २०२६ दरम्यान गुरुग्राम येथील ‘द बॉल पार्क क्रिकेट ग्राउंड’ येथे खेळवली जाणार आहे. भारतीय संघात कर्नाटकच्या दीपिका टी. सी. हिच्याकडे कर्णधारपद, तर महाराष्ट्राचे (सोलापूर) प्रतिनिधित्व करणाऱ्या गंगा कदमकडे (बी3श्रेणी) उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मालिकेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय संघाचे सराव शिबिर १६ नोव्हेंबर २०२६ पासून गुरुग्राम येथे आयोजित करण्यात आले आहे.
गंगा कदम हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आणि भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी पुनश्च निवड झाल्याबद्दल सोलापूरचे सुप्रसिद्ध उद्योजक राजेश दमाणी, भैरूरतन दमाणी अंधशाळेचे सचिव संतोष भंडारी व तिचे स्थानिक प्रशिक्षक राजू शेळके यांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस व मालिकेतील विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. गंगा कदमच्या या यशामुळे सोलापूरच्या क्रीडा जगतात उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Views: 11