देगलूर / नांदेड : शहरात सकाळी घडलेल्या भीषण घटनेने शहर हादरले आहे. अंबिका ऑईल मीलच्या मागील बाजूस असलेल्या देशी दारू दुकानाच्या आवारात किरकोळ वादातून एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी शेख शादूल शेख सलीमसाब (वय ४५, रा. आनंदनगर, भायेगाव रोड, देगलूर) आणि मयत शेख निसार शेख बाबूमिया (रा. लाईन गल्ली, देगलूर) यांच्यात अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्याप्रकरणी वाद झाला. या वादात शादूल शेखने धारदार शस्त्राने निसारच्या गळ्यावर वार करून त्याचा जागीच खून केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून, आरोपी शादूल शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.
























