मोडनिंब – महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतुकीचे प्रभावी नियमन करणे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणे, या उद्देशाने महामार्ग पोलीस मदत केंद्र मोडनिंबकडून सन २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. दहा विविध प्रकारच्या कारवायांसह जनजागृती उपक्रम राबवून वाहतूक शिस्त आणि रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पोलीस, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोडनिंब मदत केंद्राकडून महामार्गावरील सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच वाहनचालकांमध्ये नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.याअंतर्गत शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले. साखर कारखान्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. तसेच आषाढी वारीच्या काळात दिंड्यांना सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.दरम्यान, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील मौजे विमाननगर येथे डेटा सेंटरच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ अपेक्षित होती. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी वाहनांना पर्यायी मार्गाने वळविले. त्यामुळे प्रवाशांना मोठा अडथळा न येता वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश आले.महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत करणे, रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सहकार्य करणे आणि वाहतुकीतील अडथळे दूर करणे यासाठीही मदत केंद्राकडून तत्परतेने काम केले जात आहे. केवळ दंडात्मक कारवाई न करता अपघात रोखणे, वाहतूक शिस्त रुजविणे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.एकूणच, कारवाई, जनजागृती आणि वाहतूक नियोजनाच्या माध्यमातून महामार्ग मोडनिंब मदत केंद्राने केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.