मुक्रमाबाद / नांदेड – देगलूर येथील पोतदार इंग्लिश स्कूल मध्ये पाचवी वर्गात शिकत असलेला दहा वर्षांचा रुद्र ज्ञानेश्वर रातोळीकर नंबर (BIB NO.21995) यानी रविवारी पुणे येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटर हाफ-मॅरेथॉनचे अंतर 155 मिनिटं (2:35) मिनिटात यशस्वीरीत्या पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एवढ्या लहान वयात इतक्या मोठ्या अंतराची शर्यत पूर्ण करून नांदेड जिल्हयाचे नाव लौकिक केल्यामुळे रुद्रचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रातोळी येथील भुमीपुत्र तथा महसुल अधिकारी ज्ञानेश्वर रातोळीकर यांचे पुत्र रुद्र तसा अभ्यासात हुशार आहे. यामुळे त्याला शिक्षणा बरोबर चांगले संस्कार मिळाले याबरोबर त्याला खेळाची सुध्दा आवड असल्यामुळे शर्यतीदरम्यान रुद्रने विलक्षण जिद्द, सहनशक्ती आणि धावण्यावरील प्रेम दाखवले. मार्गावर प्रेक्षकांनी त्याला मोठ्या उत्साहात दाद दिली. शर्यत पूर्ण केल्यानंतर रुद्रने आनंद व्यक्त करताना सांगितले की, “मला धावणे खूप आवडते. मोठ्या धावपटूंना पाहून मीही मोठ्या स्पर्धांमध्ये धावण्याचे स्वप्न पाहतो.”असे दैनिक सामना शी बोलताना म्हणाले.
रुद्रच्या पालकांनी आणि प्रशिक्षकांनी त्याच्या शिस्तीचे, मेहनतीचे आणि सातत्याचे कौतुक केले. शर्यत आयोजकांनीही इतक्या लहान वयात 21 किमी.पूर्ण केल्याबद्दल त्याचा विशेष गौरव केला.
रुद्रच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पुण्यात तसेच जिल्ह्यातील इतर बालधावपटूंमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.
योग्य मार्गदर्शन आणि सराव मिळाल्यास रुद्र भविष्यात जिल्हा व राज्यस्तरावर नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या त्याच्या यशा बदल मामा निखील पा. कोठारे व तलाठी सतीष देशमुख,औदुबंर वाडीकर, शिवाजी तोत्रे, महेश पदाजी, मारोती भुताळे, सदाशिव बोयवार, शेशीकांत तेलंग, अमजत पठाण, अशोक लोणीकर, रज्जाक कुरेशी, शिओम पाटीलसह आदीने अभिनंदन केले आहेत.




















