वैराग – बार्शी तालुक्यातील तीर्थक्षेत्र सासुरे येथे श्री महांकाळेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य व प्रतिष्ठेच्या ‘महांकाळेश्वर केसरी’ कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या रामा कांबळे यांनी मानाच्या किताबावर आपले नाव कोरले. तब्बल ३७ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या आणि चित्तथरारक लढतीत अकलूजच्या करण मिसाळ यांच्यावर गुणांच्या आधारे मात करीत कांबळे यांनी १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानाची चांदीची गदा पटकावली.
कार्तिक पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या श्री महांकाळेश्वर यात्रेच्या पहिल्या दिवशी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत सूर्योदयाच्या साक्षीने सगुण-साकार परमेश्वराचा अवतार मानल्या जाणाऱ्या ‘टोपाचा छबिना’ मोठ्या भक्तीभावात निघाला. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दिवसभर पार पडलेल्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी यात्रेचा उत्साह द्विगुणित केला.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री महांकाळेश्वर सार्वजनिक कुस्ती कमिटीच्या वतीने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानाचे उद्घाटन शशिकांत पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अनिल बारंगुळे, दीपक पाटील, सुनील बारंगुळे, वैभव सातपुते, आनंद करंडे, उदय आवारे, दिनेश करंडे, तुषार आवारे, नागेश आवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
३७ मिनिटांची रंगतदार लढत आणि मुख्य निकाल
मैदानातील सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि मानाची ‘महांकाळेश्वर केसरी’ कुस्ती पुण्याचा रामा कांबळे आणि अकलूजचा करण मिसाळ यांच्यात रंगली. दोन्ही मल्लांनी एकमेकांच्या डावपेचांना चोख प्रत्युत्तर देत तब्बल ३७ मिनिटे निकराची झुंज दिली. ताकद, चपळाई आणि कुस्ती कौशल्याचा अप्रतिम संगम असलेल्या या लढतीने मैदानात चांगलीच रंगत आणली. अखेर गुणांच्या आधारे पंचांनी रामा कांबळे यांना विजयी घोषित केले.
महांकाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व मार्गदर्शक डॉ. अजय करंडे यांच्या हस्ते कांबळे यांना १ लाख रुपयांचे पारितोषिक आणि मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली. यावेळी माजी सरपंच तात्यासाहेब करंडे, उद्योजक प्रशांत भारती, वस्ताद अशोक करंडे, शहाजी नेमाने, बालाजी आवारे आदी उपस्थित होते.
इतर प्रमुख लढतींचा निकाल
* द्वितीय क्रमांक (७५ हजार रुपये): कोल्हापूरचा विक्रम गायकवाड आणि कंदरचा हनुमंत काळे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत हनुमंत काळे यांनी बाजी मारली.
* तृतीय क्रमांक (५० हजार रुपये): आटपाडीचा सचिन काळे आणि कंदरचा संकेत शिंदे यांच्यातील लढतीत संकेत शिंदे विजयी ठरले.
* चतुर्थ क्रमांक (४१ हजार रुपये): पुण्याचा सूरज मगर आणि कोल्हापूरचा दादा नाईकवाडे यांच्यात झालेल्या लढतीत सूरज मगर यांनी विजय मिळवला.
मर्दानी खेळाचा उत्साह आणि समालोचन
सुमारे सहा तास रंगलेल्या या कुस्ती मैदानात राज्यभरातून आलेल्या नामांकित मल्लांसह लहान-मोठ्या गटांतील अनेक चुरशीच्या कुस्त्या पार पडल्या. मल्लांच्या दमदार कामगिरीला कुस्तीशौकिनांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. यात्रेतील कुस्ती मैदानाने सासुरेच्या धार्मिक परंपरेला मर्दानी खेळाच्या उत्साहाची जोड दिली. या संपूर्ण स्पर्धेचे प्रभावी व अभ्यासपूर्ण समालोचन अनिल धोत्रे यांनी केले.
Views: 10