अकलूज – २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शूरवीर जवानांना अभिवादन करण्यासाठी ‘शहीद दिन’ या औचित्याने अकलूज पोलीस स्टेशन आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या सामाजिक उपक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अकलूज परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान आणि २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार म्हणाले की “संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत.त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे कर्तव्यही दिले आहे.शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण करत रक्तदानासारख्या महादानातून एखाद्याचे प्राण वाचवणे,हीच त्यांना खरी त्यांना श्रद्धांजली आहे.”
या वेळी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे,आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक प्रा.धनंजय देशमुख,पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम, करीश्मा वणवे यांच्या सह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संकलित झालेल्या रक्तामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.सर्व रक्तदात्यांना महर्षि शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलूजच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अकलूज पोलीस स्टेशनचे बबलू गाडे,शिवप्रसाद मदभावी,आर्ट ऑफ लिव्हिंगचे माऊली मुंडफणे,अतुल माने, स्वानंद भागवत स्वयंसेवक तसेच स्थानिक रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले.