सोलापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती महिला प्रभाग संघ संचालित ‘श्री गणेश महिला प्रॉड्यूसर गटा’च्या ‘श्री गणेश दुग्धालय’ चे विंचूर येथे नुकतेच उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या जीवनोन्नतीला नवी दिशा मिळणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत डेअरी व्यवसायाला “सोन्याचे खाण” मानले जाते. तुम्ही निव्वळ ग्राहक न राहता, आता उत्पादक आणि उद्योजक बनला आहात असे प्रतिपादन आलेल्या मान्यवरांनी आपल्या भाषणात केले.
यावेळी गावचे सरपंच बाळासाहेब पाटील, ग्रामसेविका सुजाता व्हनकडे, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गणेश जगताप आणि त्यांचे सहाय्यक व्यवस्थापक मंगेश, पंचायत समितीचे वाघमारे, उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक अलीम, अतुल, आणि चौधरी, कृषी सहाय्यक अधिकारी राठोड तसेच माजी सरपंच श्रीमंत पुजारी तसेच पोलीस पाटील मल्लिकार्जन झाडबुके आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला उद्यमी सीआरपी प्रमीला विजयकुमार वांगीकर यांच्यासह मंद्रुप विभागातील सर्व सीआरपी महिला आणि गावातील बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी दूध हा आरोग्याशी जोडलेला घटक असल्यामुळे आपल्या उत्पादनाचा दर्जा, ग्राहकांचे विश्वास संपादन करणे, नविनता व व्यवस्थापन आणि सर्व महिला एकत्रित एकजूट होऊन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी आवाहन केले.






















