सोलापूर – जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांमध्ये गुणवत्ता, शाश्वतता आणि योग्य नियोजनाला प्राधान्य देत कामकाज अधिक प्रभावी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले. राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
( टीप मेल वरील फोटो लावणे)
भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या विकासकामांमध्ये अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असून, तांत्रिक ज्ञानाचा प्रभावी वापर करून कामांची गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, शासकीय इमारती आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे करताना दर्जा आणि टिकाऊपणाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन सीईओ जैन यांनी केले.
देशाच्या पायाभूत विकासात अभियंत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. विश्वेश्वरय्या यांनी नियोजन, तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेच्या माध्यमातून देशाच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन बदलत्या काळातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विकासकामांमध्ये करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी देखील सर्व अभियंतांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीणकर, कार्यकारी अभियंता क्रमांक एक असिफ खैरीदी, प्र. कार्यकारी अभियंता क्रमांक दोन अतुल लेंडवे, शाखा अभियंता विलास कोंडगुळे, कार्यकारी अभियंता जयेश हेडगीरे, उपाध्यक्षांचे स्वीय सहाय्यक विशाल घोगरे आदींसह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अभियंते उपस्थित होते.
Post Views: 18