मंगळवेढा – आम्ही सोलापूर पोलीस आहोत… मंगळवेढ्यात खून झालाय… अंगावरचे सोने काढून कागदात ठेवा… अशी बतावणी करून मंगळवेढा शहरात भरदिवसा दोन भामट्यांनी दोन शेतकऱ्यांना तब्बल २ लाख १६ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
*घटना काय घडली ?*
काल दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता मारापूरचे शेतकरी सिद्धेश्वर यादव (६०) हे भाजीपाला घेण्यासाठी मंगळवेढ्यात आले होते. परत जाताना पंढरपूर रोडवरील भुसे मशिनरी दुकानासमोर दोन इसमांनी त्यांना अडवले. “आम्ही सोलापूर पोलीस,आहाेत मंगळवेढ्यात खून झालाय, सोने काढा” असे सांगितले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या बाईकस्वाराचेही दागिने काढून कागदात गुंडाळून दिल्याचे नाटक केले. हे पाहून यादव यांनीही विश्वास ठेवून गळ्यातील २१ ग्रॅमची चैन व १० ग्रॅमची अंगठी काढून दिली. भामट्यांनी कागदाची पुडी करून हातात दिली आणि पसार झाले.
पेट्रोल पंपावर पुडी उघडली तर आत सोने नाही, दोन लहान दगड निघाले व फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
शहरात शोध घेत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. त्याच दिवशी दुपारी ३.४० वाजता सोलापूर-मंगळवेढा महामार्गावरील कारखाना पाटीजवळ वडदेगाव, ता. मोहोळ येथील दिलीप सुरसे (६४) हे पत्नीला घेऊन जात असताना त्यांनाही याच टोळीने त्याच पद्धतीने लुटले. त्यांची ३० हजारांची अंगठी लंपास केली.
*आरोपींचे वर्णन :*
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी मराठी बोलतात. एक उंची ५.८ फूट, काळा सावळा, मजबूत बांधा, तर दुसरा ५.५ फूट, सावळा, मध्यम बांधा. दोघांनीही मळकट पांढरा शर्ट व काळी पॅन्ट घातली होती. मिशी नाही.
या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दोन अनोळखी भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पाेलीस करीत आहेत.
*सावधान !*
खरे पोलीस कधीही रस्त्यावर अडवून दागिने काढायला सांगत नाहीत. असा कोणी आढळल्यास तात्काळ ११२ वर कॉल करा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
Post Views: 17