सोलापूर : लोकमंगल परिवाराच्या वतीने सोलापुरतील हेरिटेज गार्डन या ठिकाणी स्नेहसंवाद मेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यास लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उपस्थित सभासदांना संबोधित करताना आमदार देशमुख म्हणाले की, सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांची कामावरील निष्ठा यामुळे लोकमंगल परिवारातील बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट या तिन्ही आर्थिक संस्थांनी ५००० कोटी व्यवसायाची ऐतिहासिक पूर्तता केली आहे. लोकमंगल परिवार नेहमी शेवटच्या घटकातील व्यक्तींना केंद्रबिंदु मानून त्यांना आधार व सक्षम बनविण्यासाठी काम करत असून ते यापुढेही चालू राहील असे संगितले. सभासदांनी लोकमंगलवर ठेवलेला विश्वास आणखी दृढ करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले की लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजना, सामुदायिक विवाह सोहळा याबरोबरच शहर व जिल्ह्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना निरंतर मोफत गोळ्या, औषधे वाटप करण्याचे ठरविले असून त्याची प्राथमिक सुरुवात १२ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा मानस असून याचा व्यापक स्वरुपात विस्तार करण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी संगितले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये पतसंस्थेचे तज्ञ संचालक अॅड. गजानन भाकरे यांनी लोकमंगल समूह आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
या स्नेह संवाद मेळाव्यात सभासदांनी आपले प्रश्न, अडचणी आणि सूचना मांडल्या. त्यास आमदार देशमुख यांनी समर्पक उत्तरे देत समाधानकारक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, व्हाईस चेअरमन निर्मला कुंभार, कार्यकारी संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनीष देशमुख, संचालक फैय्याज मुलाणी, भुताळी बाराचारी, लक्ष्मी नडगेरी, बँकेचे संचालक जितेंद्र लाड, प्रल्हाद कांबळे, सिद्धार्थ सर्जे, अभिजीत टाकळीकर, फाउंडेशन चे संचालक मारुती तोडकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस, पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका अलका देवडकर, मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जाधव यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश लोंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुदन सुरवसे यांनी व्यक्त केले.
















