सांगोला – राज्य निवडणूक आयोग यांच्या दि.२९ नोव्हेंबर रोजीच्या आदेशाने प्रभाग क्र.१ जागा क्र.१ अ आणि प्रभाग क्र.११ जागा क्र.११ अ या दोन जागांसाठी अपील झाले असल्याकारणाने सदर दोन जागांचे मतदान दि.२० डिसेंबर रोजी घेण्यात येणार होते. परंतु बुधवार दि.१० डिसेंबर रोजी दु.३ वा. पर्यंत सदर जागांमधील नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत होती.
बुधवार दि.१० डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांचे समोर प्रभाग क्र.१ जागा क्र.१ अ मधून मस्के मीरा धनंजय आणि प्रभाग क्र.११ जागा क्र.११ अ मधून तांबोळी जाकेरा रियाज यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे प्रभाग क्र.१ मधील जागा क्र.१ अ मधून माने राणी आनंदा आणि प्रभाग क्र.११ मधील जागा क्र.११ अ मधून केदार सावंत सुजाता चेतनसिंह यांचे नामनिर्देशपत्र शिल्लक राहिले आहे. राहिलेल्या उमेदवारांना बिनविरोध घोषित करण्यासाठीचा विस्तृत अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी दिली.

प्रभाग क्र.१ जागा क्र.१ अ मधून बिनविरोध झालेल्या राणी माने या यापूर्वीच्या काळात लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या. तसेच प्रभाग क्र.११ जागा क्र.१ अ मधून बिनविरोध झालेल्या सुजाता केदार सावंत ह्या भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या पत्नी आहेत. दरम्यान सांगोला नगरपरिषद नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप, दिपकआबा साळुंखे पाटील गट, शेकाप पुरस्कृत शहर विकास आघाडी यांचे मध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. त्यामुळे राहिलेल्या या दोन जागेसाठी पुन्हा प्रचाराच्या तोफा धडाडणार असे त्या प्रभागातील मतदारांना, शहर व तालुक्यातील नागरिकांना वाटत होते. परंतु दोन्ही जागा बिनविरोध झाल्याने सोशल मीडियावर दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती. आता दि.२१ डिसेंबर रोजीच्या निकालाकडे नागरिकांमध्ये उत्सुकता लागलेली दिसून येत आहे.
पालकमंत्री गोरे यांच्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी बिनविरोध
भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेले गैरसमज दूर झाले असून यापुढील सर्व काळात भाजप-शिवसेना ही आघाडी मजबूत राहील. आम्ही एकत्र काम करू, माझे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मतभेद संपलेले आहेत. त्यांनी निर्णय घेतल्यामुळे माझ्या या दोन लाडक्या बहिणी बिनविरोध निवडून आले आहेत. याचे श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आहे.
-माजी आ.शहाजीबापू पाटील, शिवसेना नेते


















