सोलापूर : रेल्वे ब्रिज वाहतुकीसाठी बंद केल्याने पर्यायी मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने आज राबविली. शेटे वस्ती ब्रिज परिसरातील या मार्गावर असलेली अतिक्रमित 20 खोके जेसीबीच्या साह्याने जागेवरच निष्काशीत करण्यात आली.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक नजीक असलेल्या रेल्वे ब्रिजचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी या रेल्वे ब्रिजवरील वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. यादरम्यान, नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे. या पर्यायी मार्गावर शेटे वस्ती ब्रिजच्या परिसरामध्ये विविध अपार्टमेंट समोर रस्त्याच्या कडेला रहदारीस अडथळा ठरणारी खोकी होती. अशी एकूण पंधरा ते वीस अतिक्रमित खोकी आज अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने जेसीबीच्या साह्याने निष्काशीत केली. या परिसरात केदारनाथ अपार्टमेंट, खमितकर अपार्टमेंटसमोरील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली आणि महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सोलापूर शहरातील नागरिक व व्यवसायिकांनी रस्त्यावर अडथळा ठरेल अशा पद्धतीने अतिक्रमण करू नये. नियमानुसार आपला व्यवसाय करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.


















