माहूर / नांदेड – दैनिक तरुण भारत मध्ये दि. १० डिसेंबर रोजी ‘वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित होताच या बातमीची तातडीने दखल घेत माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी २४ तासाच्या आत उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद आणि माहूरच्या कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम तयार करून स्वतः हजर राहत सदरील उपद्रवी वानरास आज बुधवार दि.१० डिसेंबर रोजी जेरबंद केले… आणि या वानराच्या भीतीमुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला.
माहूर तालुक्यातील टाकळी येथे एका वानराने अनेक दिवसांपासून येथील नागरिकांना हल्ले करून नुकसान करणे सह इतर प्रकारे उपद्रव माजवून सळो की पळो करून सोडले होते त्यामुळे येथील सरपंच आणि ग्रामसेवकांनी निवेदन देऊन सदरील वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी २४ तासाच्या आत उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद आणि माहूरच्या कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम तयार करून स्वतः हजर राहत सदरील उपद्रवी वानरास आज बुधवार दि.१० डिसेंबर रोजी अखेर जेरबंद केले.
उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक किनवट किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रोहित जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांच्या आदेशान्वये वनपरिक्षेत्र कार्यालय माहूर अंतर्गत वनपरिमंडळ माहूर नियतक्षेत्र वझरा मधील मौजे टाकळी या गावात मागील काही दिवसांपासून एक नर वानर गावातील लोकांवर हल्ला करून पळून जात असे.
अखेर आज बुधवारी या वानराला पुसद येथील आर आर यु टीम च्या मदतीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगराणीत रेस्क्यू करण्यात आले व त्याला निसर्ग अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी वनपाल माहूर मनोहर कत्तुलवार, वनरक्षक दिपक माने, महेश मांजलवाड, आर आर यु टीम चे प्रमुख शे. मुखबीर ,वनरक्षक रवी राठोड, किरण सातपुते, मानद वन्यजीव रक्षक पशुसेवक रवी मोरे, वनसेवक कैलास जाधव व परमेश्वर नाईक यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कारवाही करून वानरास जेरबंद केल्याप्रकरणी माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचे अभिनंदनासह आभार व्यक्त केले जात आहे.


















