सोलापूर : महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी मालमत्ता करासोबतच भूमी-मालमत्ता विभागाच्या अखत्यारित असलेल्या मेजर व मिनी गाळ्यांची थकबाकी वसूल करण्यावर प्रशासनाने भर द्यावा. थकबाकीदार गाळेधारकांना नोटिसा बजावूनही वसुली प्रलंबित असल्यास नियमानुसार कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश
महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने विविध विभागांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून भूमी-मालमत्ता विभागाच्या अखत्यारितील मेजर व मिनी गाळ्यांबाबत महापौर कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव, सहायक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गाळ्यांची सद्यस्थिती, भाडे व अन्य देयकांची वसुली, प्रलंबित थकबाकी तसेच थकबाकीदारांवर करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला.शहरात महापालिकेच्या मालकीचे एकूण किती मेजर व मिनी गाळे आहेत, त्यापैकी नियमित भाडे भरणाऱ्या गाळेधारकांची संख्या किती आहे, किती गाळ्यांची थकबाकी प्रलंबित आहे, थकबाकीदारांना आतापर्यंत किती नोटिसा बजावण्यात आल्या, याची माहिती महापौरांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
तसेच थकबाकीपोटी किती गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात आली, किती रक्कम वसूल झाली आणि अद्याप किती थकबाकी बाकी आहे, याचीही माहिती घेण्यात आली. महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेअंतर्गत गाळेधारकांकडून झालेल्या वसुलीचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.
महापालिकेच्या तिजोरीत येणे असलेली प्रत्येक रक्कम वेळेत जमा झाली पाहिजे. थकबाकी वसुलीत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. नोटिसा बजावलेल्या गाळेधारकांकडून तातडीने वसुली करावी तसेच उर्वरित थकबाकीदारांकडूनही नियमानुसार कारवाई करून रक्कम वसूल करावी, असे निर्देश कोंड्याल यांनी दिले.महापालिकेच्या मालमत्तेचा योग्य वापर होण्यासोबतच त्यातून मिळणारे उत्पन्नही वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यकतेनुसार कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
—-
Post Views: 10