बार्शी – सोलापूर ग्रामीण पोलीसच्या बार्शी शहर पोलीस ठाण्याने हरवलेले ४८ मोबाईल फोन शोधून काढले असून, त्यांची किंमत सुमारे ९ लाख ५० हजार रुपये आहे. सदरचे मोबाईल संबंधित मालकांना परत करण्यात आले आहेत. तसेच जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत एकूण १०९ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत, त्यांची एकूण किंमत २१ लाख ३० हजार रुपये आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा, बसस्थानके, रेल्वे स्थानके, यात्रा आणि प्रवासादरम्यान हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यावर भर देण्यात आला. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या सीईआयआर पोर्टलचा वापर करुन हे मोबाईल ट्रॅक करण्यात आले.
पोलीस दलाने नागरिकांना हरवलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवण्याचे आणि सीईआयआर पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेमुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला असून, पोलीस दलाच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष जाधव (९४८), सचिन देशमुख (१९७४) आणि सायबर सेलचे रतन जाधव (११४२) यांचा समावेश होता. हे मोबाईल लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यासारख्या ठिकाणांहून हस्तगत करण्यात आले आहेत.

















