सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज शहरात बेगम पेठ, मधला मारुती आणि कन्ना चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यामध्ये बेगम पेठेत अतिक्रमण काढत असताना अधिकाऱ्यांबरोबर शाब्दिक चकमक झाली. पोलीस बंदोबस्तात अखेर अतिक्रमण काढण्यात आले.
महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने सोलापुरात रस्त्यावर अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, आज गुरुवारी अतिक्रमण विरोधी पथकाने सोलापूर शहरात विविध तीन ठिकाणी अतिक्रमण काढले. सकाळच्या सत्रात
बेगम पेठ येथे कारवाई करण्यात आली. या ठिकाणी शिवसेना कार्यालयाच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर मुतारी पाडून त्या ठिकाणची वडापावची टपरी जेसीबीच्या साह्याने निष्काशीत करण्यात आली. त्यानंतर मधला मारुती येथे कारवाई करण्यात आली. येथील हाराच्या दुकानांसमोर असलेल्या बामट्या व इतर साहित्य काढण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात कन्ना चौक येथे रस्त्यावर अडथळा ठरणारी बँजो पार्टीची चार चाकी गाडी जप्त करण्यात आली. या कारवाईत एक चार चाकी हातगाडीही जप्त केली आहे, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली आणि महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सोलापूर शहरातील नागरिक व व्यवसायिकांनी रस्त्यावर अडथळा ठरेल अशा पद्धतीने अतिक्रमण करू नये. नियमानुसार आपला व्यवसाय करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.


























