नायगांव / नांदेड – नायगांव तालुक्यातील कोलंबी तील सकल ग्रामस्थांच्या संकल्पनेतून साकारलेल्या– “पाणी वाचवा, पाणी साठवा” या संकल्पनेला मूर्तरूप देत ग्रामस्थांच्या एकजुटीने वनराई बंधाऱ्या ची उभारणी करून लोक सहभागाचे अद्वितीय उदाहरण संपूर्ण जिल्ह्यात घालून दिले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्थांनी श्रमदान, सामाजिक उत्तरदायित्व आणि सामूहिक भावनेतून गावालगतच्या ओढ्यावर हा बंधारा उभारला.
वनराई बंधारा हा कच्च्या स्वरूपातील पण अत्यंत परिणामकारक उपाय मानला जातो.या बंधाऱ्यामुळे पाणी साठवणूक,भूजल स्तर वाढ, तसेच मृदसंधारण साध्य होते.पाणी टंचाई सारख्या महत्त्वाच्या समस्ये वर मात करण्यासाठी हा बंधारा गावासाठी मोठी देणगी ठरणार आहे.
या उपक्रमात सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, कृषी सहायक या सह सर्व विभागांचे कर्मचारी,महिला–पुरुष नागरिक अशा मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकाच ध्येयाने प्रेरित होऊन ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाने कोलंबी गावातील विकासाची दिशा अधिक मजबूत केली आहे.
गावाच्या सकल ग्रामस्थांच्या पुढाकारा तून साकारलेला हा वनराई बंधारा केवळ पाण्याचा स्रोत नव्हे,तर जणू भविष्यातील कोलंबी ग्रामविकासाच्या नव्या उंचीची सुरुवात ठरली आहे.


















