सोलापूर – महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची उमेदवारी अर्जासाठी एकीकडे धावपळ सुरू असतानाच दुसरीकडे सोलापुरात मोठ्या परिवारातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक दत्तात्रय वानकर आणि युवा सेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल वानकर यांनी गुरुवारी दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
रविवारी आपली पुढची दिशा ठरविणार असल्याचे सांगण्यात आले. मोठे बंधू व उबाठाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी बुधवारीच पक्ष कार्यालयातून प्रभाग क्रमांक
६ मधून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचा उमेदवारी अर्ज घेतला आहे. असे असताना दुसऱ्याच दिवशी गुरुवारी गणेश वानकर यांच्या दोनही लहान बंधुनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यामुळे सोलापूरसह प्रभाग ६ मधील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करताना शिवसेना सोलापूर शहरासह जिल्हाभरात पोहोचवली. आजही ते शिवसेनेत अहोरात्र काम करत आहेत. यापूर्वी त्यांच्या पत्नी मंगलताई तर त्यानंतर प्रभाग ६ मध्ये चिरंजीव गणेश वानकर नगरसेवक म्हणून निवडून आले.
पिता प्रकाश वानकर यांच्यासह गणेश, दत्तात्रय आणि विठ्ठल या तीनही चिरंजीव बंधुची शिवसेनेतील ताकद सर्वश्रुत आहे. मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेनेतील मोठे प्रस्थ असलेल्या वानकर परिवारातील दोन सख्या भावांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यामुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ माजली आहे.


















