देगलूर / नांदेड – देगलूर तालुक्यातील “होट्टल रस्त्यावर अवघ्या चार दिवसांत पाच अपघात; एक ठार, अनेकजण जखमी” या मथळ्याखाली दि. 22 डिसेंबर 2025 रोजी “तरुण भारत” दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल आता स्थानिक तरुणांनी घेतली आहे. मात्र, ही समस्या कायमस्वरूपी सुटण्यासाठी प्रशासनाने तातडीने पुढाकार घेणे अत्यावश्यक असल्याची भावना जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
होट्टल रस्त्यावर लिंगनकेरुर जवळील चढावाचा रस्ता अतिशय धोकादायक बनला असून येथे अपघातांची मालिका सुरूच आहे. या ठिकाणी रस्त्याला तटबंदी नसणे, अतिवृष्टीमुळे रस्ता खचलेला असणे आणि योग्य दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत परिसरातील शिवाजी सूर्यवंशी, राजूभाऊ दासरवाड, कैलास गाडीवान, ओमकार पाटील, गंगाधर पाटील, सतीश डांगे, गणेश पवार, बालाजी सूर्यवंशी आदी सजग तरुणांनी स्वखर्चातून तात्पुरते उपाय करण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दगडांवर लाल रंगाचे स्टिकर्स लावून ‘धोका आहे’ अशी स्पष्ट निशाणी करण्यात आली आहे, जेणेकरून वाहनचालक सावध राहतील आणि पुढील अपघात टाळता येतील.
या तरुणांनी सांगितले की, या समस्येबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींना सर्व माहिती असूनही अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणताही जीवितहानीचा प्रकार होऊ नये, यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काही दिवसांत या ठिकाणी मोठे चेतावणी फलक व दिशादर्शक सूचना लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “हा आमचा तात्पुरता आणि छोटासा प्रयत्न आहे. मात्र शासन-प्रशासना आणि लोकप्रतिनिधींने त्वरित दखल घेऊन येथे मजबूत तटबंदी उभारावी आणि अतिवृष्टीमुळे खचलेला रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त करावा, अन्यथा या परीसरातील आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन रास्तारोको आंदोलन करु ” अशी ठाम भूमिका या तरुणांनी घेतली आहे. तरुण भारतच्या एका बातमीमुळे तरुणांमध्ये निर्माण झालेली ही जागरूकता कौतुकास्पद असली, तरी आता प्रशासनानेही याची गंभीर दखल घेऊन तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

















