सोलापूर : जीवनाचे सार्थक करायचे असेल आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शिव आराधनेचा अंगीकार करा असे सांगतानाच तन ,मन आणि धनाने शिवाची प्रार्थना केल्यास आत्मशांती मिळते,असे विचार ह.भ.प.भालचंद्र महाराज केजकर यांनी मांडले .दमानी नगर भागातील श्रद्धा महिला मंडळाच्यावतीने गड दर्शन समाज मंदिरात गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या शिव महापुराण कथेचा समारोप बुधवारी दुपारी महाप्रसादाने झाला ,यावेळी भालचंद्र महाराज बोलत होते
भगवान कोणत्याही भक्ताची जात पाहत राहत नाही.भगवान फक्त आपला शुद्ध भाव पाहतो .शिव आराधनेत शक्तिशाली सामर्थ्य आहे .भगवान शिवाचे विचार आचरणात आणा .आयुष्य समाधानकारक घालवायचे असेल तर शिवाला शरण जाणे काळाची गरज आहे .आपल्या पुढच्या पिढीला कुलधर्म कुलाचार करता आले पाहिजेत ,अशा प्रकारची शिकवण प्रत्येक मातापित्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दिली पाहिजे ,असेही ते यावेळी बोलताना मिळाले.
इच्छा ,भीती ,चिंता ,आकांक्षा आणि नापसंतीमुळे आपण फार थकून जातो .आपल्याला विश्रांतीची गरज असते ,ती विश्रांती म्हणजे ध्यान .आणि ध्यानच आपल्याला शिवतत्त्वाच्या अनुभवाकडे घेऊन जाते ,असे सांगतानाच शिव सगुण असूनही वैश्विक आहे. शिव हे सौंदर्य असूनही अदृश्य आहे .प्रत्येक नामात शिव आहे .शिवनामातच मोठी ताकद आणि सामर्थ्य असून शिव आराधना करणारा प्रत्येक व्यक्ती सुखी आणि समृद्ध जीवन जगतो ,असेही भालचंद्र महाराजांनी यावेळी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना केजकार महाराज म्हणले,शिवाचा त्रिशूळ हा सत्व ,रजस आणि तमस या तीन गुणांचे म्हणजेच सकारात्मकता ,क्रियाशीलता आणि विश्रांती या गुणांचेही प्रतिनिधित्व करतो .शिवाचा तिसरा डोळा इंद्रियांच्या आवाक्या बाहेरील ज्ञानाचे प्रतीक आहे .तिसरा डोळा हे ज्ञान आणि जागृत प्रज्ञाचे स्थान आहे .शिवाचा डमरू हे वाद्य विश्वाचे प्रतीक आहे, जे सतत विस्तारत आणि आकुंचन पावत असते ,डमरू हा या वैश्विक लयीचे आणि जीवनाच्या व विश्वाच्या अद्वैत स्वरूपाचे प्रतीक आहे.
हजारो वर्षापासून लोक ओम नमः शिवाय जप करत आले आहेत .हा जप सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक आहे. पाच ध्वनींनी हा जप बनलेला आहे .पृथ्वी ,पाणी ,अग्नी, वायू आणि आकाश ही पाच तत्वे मानवी शरीरासहसृष्टीतील प्रत्येक गोष्टींचे मूलभूत घटक आहेत .हे पाच अक्षर समूह सृष्टीतील पाच तत्त्वांचे प्रतीक आहेत. ओम म्हणजे शांती आणि प्रेम सर्व तत्वांमध्ये असलेली जीवनशक्ती ओम नमः शिवाय या मंत्राद्वारे दर्शविले जाते .म्हणूनच पर्यावरणातील पंचतत्त्वांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी ओम नमः शिवाय जप केला जातो. शिव हे एक असे मौन आणि स्थिरतेचे स्थान आहे ,जिथे मनाच्या सर्व क्रिया विलीन होतात .शिव ही अद्वैत आणि स्वतंत्र उपस्थित असलेली चेतना आहे .शिवाला शुद्ध चैतन्य म्हणून संबोधले गेले आहे. शिव या शब्दाचा मुख्य अर्थ कल्याणकारी किंवा शुभ असा आहे,म्ह्णून शिवशंकराच्या विचारांची कास धरूनच मनुष्याने आपल्या सार्वजनिक वाटचालीत धार्मिकतेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे भालचंद्र महाराज केजकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.