भोकरदन / जालना – विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमशाली जीवनकार्याची, स्वराज्याच्या संकल्पनेची व शिवकालीन इतिहासाची सखोल ओळख व्हावी, या उदात्त हेतूने श्री छञपती संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तादुंळवाडीचा ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
या अभ्यास दौऱ्याची सुरुवात राजुरेश्वर राजुर,मत्स्योदरी देवी,कपीलधारा,तुळजापूर,
पंढरपूर, नरसिंहवाडी, कोल्हापूर, पन्हाळगड, ज्योतीबागड,नाणीज,रत्नागिरी,चिपळुन,महाड,रायगड,प्रतापगड,महाबळेश्वर परीसर, वाई, नारायणपुर, जेजुरी, मोरगाव या धार्मिक व ऐतिहासिक सथळाना भेटी देऊन गडांवर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग, स्वराज्याची उभारणी, किल्ले व्यवस्थापन, शिवकालीन युद्धनीती यांचा अभ्यास केला. शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाणी, वस्तू आणि किल्ल्यांचे प्रतिरूप पाहताना विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारून निरसन करून घेतले व इतिहासाविषयीच्या ज्ञानात मोलाची भर घातली.
यावेळी विद्यार्थ्यांनी पन्हाळगड,रायगड,प्रतापगड, किल्ल्याला भेट दिली. किल्ल्याचा संपूर्ण परिसर पायी फिरून पाहताना किल्ल्याची भौगोलिक रचना, संरक्षणात्मक बांधणी, बुरुज, दरवाजे आणि पाण्याच्या टाक्यांचा अभ्यास करण्यात आला. किल्ल्यावर चालताना विद्यार्थ्यांना शिवकालीन संघर्ष, त्याग व शौर्याची जाणीव प्रकर्षाने झाली. अभ्यास दौऱ्याच्या पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांनी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावर चढाई केली.
अवघ्या दोन तासांत राजगड सर करून विद्यार्थ्यांनी बालेकिल्ल्याला भेट दिली. बालेकिल्ल्यावरून तोरणा किल्ल्याचे दर्शन घेत विविध ऐतिहासिक स्मारकांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्यानंतर कपीलधारा, तुळजापूर, पंढरपूर, नरसिंहवाडी, कोल्हापूर, मातेचे दर्शन घेतले. तसेच तेथील शिलालेख व ऐतिहासिक नोंदी पाहून इतिहास समजून घेतला.
या संपूर्ण अभ्यास दौऱ्यात विद्यालयाचे प्राचार्य संजय पैठणकर याच्या मार्गदर्शना खाली व सहल प्रमुख डी बी ठाकरे यांच्या सोबत सह शिक्षक पी एम पाटील,प्रा अंकुश जाधव,प्रा भगवान जाधव,राजेंद्र डेडवाल,सौ उषाताई खैरे,सौ आशाताई ठाकुर,मोहित जयस्वाल,हरिभाऊ गव्हाड यांनी उत्तम नियोजन, मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन करत परिश्रम घेतले.
या अभ्यास दौऱ्यात एकूण ८२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चार दिवसांच्या या दौऱ्यानंतर विद्यार्थी सुरक्षित व सुखरूपरीत्या शाळेत परतले. हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी केवळ सहल न राहता, इतिहास प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी, स्वराज्याची प्रेरणा, देशप्रेमाची भावना आणि नेतृत्वगुणांचे संस्कार देणारा ठरला, अशी प्रतिक्रिया शिक्षक व पालकांनी व्यक्त केली.

















