सांगोला – शक्तीपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी मुळ आरेखणाप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग होण्यासंदर्भात शुक्रवार दि.२६ डिसेंबर रोजी बिर्ला भवन, कार्यशाळा पंढरपूर येथे समर्थनार्थ मेळावा घेतला. सदर मेळाव्यास सांगोला, पंढरपूर, मोहोळ या तालुक्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी मोहोळचे आ.राजू खरे, माजी आ.प्रशांत परिचारक, सांगोल्याचे आ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, पंढरपूर भाजप तालुकाध्यक्ष मस्के, माजी सभापती विजयदादा देशमुख उपस्थित होते.
सदर तालुक्यातील मोजण्याचे काम पूर्ण होवून काही तालुक्यातील काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. तसेच हद्दी खुणा पूर्ण झाले असताना अचानक सदरचा रस्ता नव्या आरेखणानुसार करण्याचा चुकीचा हेतू शासनाने घेतल्यामुळे सर्व शेतकऱ्यांमधून संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. सदरच्या रस्त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्याचा फार मोठ्या प्रमाणात विकास होवून दळणवळणास चालना मिळणार होती. तरी सोलापूर तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व शक्तीपीठ बाधीत शेतकरी हे जुन्या आरेखणानुसार भुसंपादनास तयार असून लवकरात लवकर शासनाने विचार करून पुर्वीचे करण्यात आलेले आरेखणच कायम करणेबाबत शेतकऱ्यांनी संमती दिली असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.




















