सोलापूर : डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांचा पाचवा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘उरूज’ हुतात्मा स्मृती मंदिर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवणे व त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. देशभक्ती, शिक्षण, सामाजिक जाणीव व नैतिक मूल्यांवर आधारित नृत्य, नाट्य व सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना प्रभावी संदेश दिला.
यावेळी व्यासपीठावर जमियत उलेमा-ए-हिंदचे मौलाना इब्राहिम, वाईस ऑफ मिडीयाचे तौफिक नदाफ, वैद्यकीय शिक्षणातील योगदान दिल्याबद्दल डॉ. वसीम बेनेशिरूर, शिक्षण व वर्गाबाहेरील मार्गदर्शन पुंडलिक कलखंबकर, वळसंग पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल डोंगरे यांचा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला व राहुल डोंगरे यांनी सोलापुर ग्रामीणचे एसपी अतुल कुलकर्णी यांच्यावतीने हे पुरस्कार स्वीकारला तसेच यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगचे सदस्य वसीम बुरहान, डॉ. अमजद सय्यद, फारूक शाब्दी, अयाज शेख, अजीम पटेल, हसीब नदाफ, रियाज खरादी, वारिस कुडले हे मान्यवर उपस्थित होते.
फारूक शाब्दी यांनी आपल्या भाषणात शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचे व ‘उरूज’ महोत्सवाच्या दर्जेदार आयोजनाचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील शिस्त, विषयांची निवड आणि सामाजिक-नैतिक मूल्यांवर दिलेला भर याबद्दल त्यांनी विशेष प्रशंसा केली.
या महोत्सवाचा सर्वात भारतीय महिला अंध क्रिकेट संघाच्या उपकर्णधार व विश्वचषक विजेत्या कु. गंगा कदम यांचा ‘भारत की बेटी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ सादर करण्यात आलेल्या मानवंदना कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षक भावूक झाले. गंगा कदम यांचा संघर्षमय प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून मर्यादा या केवळ मनात असतात हा संदेश त्यांनी प्रभावीपणे दिला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेच्या पालक संस्था युनिक एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक डॉ. असदुल्लाह खान, विश्वस्त सादुल्लाह खान, नसीन खान, फरहान बामणी, इबादुल्लाह खान तसेच शाळेचे प्राचार्य मोहम्मद साकिब सय्यद उपस्थित होते.

















