सोलापूर : पराभवाने खचून न जाता नव्या जिद्दीने संघटन मजबूत करावे. जनसामान्यांचा आवाज बनून रस्त्यावरचा संघर्ष वाढवा, नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा द्या. काँग्रेस ही तत्त्वांची लढाई लढणारी पार्टी आहे. लढून हरलो तरी तो पराभव सन्मानाचा आहे, पराभूत उमेदवारांनी ‘शॅडो नगरसेवक’ म्हणून काम करत नागरिकांच्या समस्या मांडाव्यात, लोकांशी संपर्क कायम ठेवावा आणि पुढील निवडणुकांसाठी संघटनात्मक ताकद वाढवावी, असे आवाहन खा. प्रणिती शिंदे यांनी केले.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांची आढावा बैठक खासदार प्रणिती शिंदे आणि शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी मोहन जोशी यांच्या उपस्थितीत पार पडली. शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. यावेळी खा. शिंदे पुढे म्हणाल्या, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना थारा दिला जाणार नाही, असे स्पष्ट करत लवकरच सल्लागार समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
या बैठकीस नगरसेवक नरसिंह आसादे, माजी महापौर संजय हेमगड्डी, अरिफ शेख, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, नरसिंग कोळी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, भटक्या-विमुक्त विभाग अध्यक्ष युवराज जाधव, प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम, शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापूर, उत्तर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोढे, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते, भारती ईपलपल्ली, एन. के. क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, अशोक कलशेट्टी, दत्तू बंदपट्टे, प्रीती देवकते, कल्पना रव्वा, धोंडप्पा तोरणगी, खुद्दुसिया मणियार, नसीम खलिफा, शहजादिबेगम बडेपीर, शोहेब महागामी, सपना म्यागेरी, कल्पना नरोटे, डॉ. आप्पासाहेब बगले, वशिष्ठ सोनकांबळे, दिनेश म्हेत्रे, सुभाष वाघमारे, राजेश झांपले, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटना मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार
निवडणूक निकालांवर बोलताना शहर प्रभारी मोहन जोशी यांनी भाजपवर जोरदार टीका करत, “भाजप नव्हे, ईव्हीएम निवडून आला आहे,” असा आरोप केला. प्रभागरचना, मतदार यादी आणि शासकीय यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला. निकालानंतर खचून न जाता संघटना मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.



















