पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्या निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री संत तुकाराम भवन तसेच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे आकर्षक व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठलांच्या गाभाऱ्यावरील कळसास विशेष विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे भाविक कळस दर्शनासह रोषणाईचा मनमुराद आनंद घेत आहेत. संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशमय झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात आली असून, याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टिकल लाईट्स, व्हाईट व वॉर्म फोकस लाईट्स आदी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती अत्याधुनिक यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे.



















