हदगाव – जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री. साईबाबा निवासी अपंग विद्यालय, हदगांव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे नाव उज्वल केले आहे. विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदकांवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धेत विद्यालयाच्या युवराज खरसकर हा १०० मिटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक तर कु. दुर्गा रॅपनवाड ५० मीटर धावणे व समर्थ पोटे लगोरी या खेळत प्रथम क्रमांक या विद्यार्थ्यांनी पटकावले. दिव्यांग असूनही जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध केली.
या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. पाळेकर, तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व परिश्रम मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत योग्य प्रशिक्षण दिल्यामुळे हे यश मिळाले असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
विद्यालयाच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पालक, शिक्षणप्रेमी व परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही राज्य व राष्ट्रीय स्तरावर अशीच कामगिरी घडवावी अश्या शुभेच्छा दिल्या जात आहेत अशी माहिती शाळेचे अधीक्षक भूषण नरवाडे यांनी प्रसार माध्यमाना दिली.


























