सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी ‘कुलगुरू टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२६’चे आयोजन केल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक तथा प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी दिली.
ही स्पर्धा 3 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत सोलापुरातील चार मैदानांवर होणार असून या स्पर्धेत राज्यातील १७ विद्यापीठांतील कर्मचारी संघाचे सहभाग आहे. राज्यातील विद्यापीठांतील कर्मचारी वर्गामध्ये क्रीडावृत्ती वाढविण्यासह आपसी सलोखा, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी दरवर्षी कुलगुरू चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. लीग कम नॉकआउट पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन होत असते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सोलापूर शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम पार्क मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण, भंडारी ग्राउंड तसेच दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून, त्यामुळे शहरात एकाच वेळी चार ठिकाणी क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवार, दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी साडेचार वाजता विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे असणार असून उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनापूर्वी सर्व संघांचा मार्च पास होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील होईल. स्पर्धेचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता इंदिरा गांधी स्टेडियम, पार्क मैदान येथे होणार आहे.
———
या १७ विद्यापीठाचे संघ सहभागी होणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.























