धाराशिव : धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वय (दिशा) समितीची महत्त्वपूर्ण बैठक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व टंचाई निवारण, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे, धाराशिव शहरातील रखडलेली उद्यान विकासकामे, ग्रामीण व शहरी रस्त्यांची दुरुस्ती, तसेच प्रलंबित पायाभूत सुविधांच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकविमा व कृषी अनुदान, ग्रामीण आरोग्य सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधा, शाळांमधील मूलभूत सोयी-सुविधा, प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा, वीजपुरवठा व कृषीपंपांच्या समस्या, महिला व बालकल्याण योजना, स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयांकडे संबंधित विभागांचे लक्ष वेधण्यात आले.
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, निधीची उपलब्धता आणि योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेण्यात आली. मंजूर असूनही प्रलंबित असलेली कामे, निधीअभावी रखडलेले प्रकल्प आणि नागरिकांच्या तक्रारी यांचा प्राधान्याने निपटारा करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. प्रलंबित प्रश्नांवर केवळ आढावा न घेता त्यावर ठोस कार्यवाही करून कामांना गती द्यावी, अशा सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या प्रश्नांची प्रभावी सोडवणूक आणि शासकीय योजनांची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करावे. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहील, असे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले.




















